पिंपरी (दिनांक : १० मार्च २०२३):- “जीवनात जगू आता तुका थोडा थोडा…” या कवी शंकर आथरे यांच्या कवितेसह शब्दधन काव्यमंच आयोजित ‘तुका आकाशाएवढा…’ या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजसोहळ्यानिमित्त कविसंमेलनात सुमारे वीस कवींनी सहभागी होत भक्तिरसाचा परिपोष केला. गुरुवार, दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे संपन्न झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. अशोकमहाराज गोरे होते; तर ह.भ.प. अशोकमहाराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभा जोशी, डॉ. पी. एस. आगरवाल, संगीता झिंजुरके, जयश्री गुमास्ते, सुभाष शहा, शिवाजीराव शिर्के, फुलवती जगताप, आत्माराम हारे, मधुश्री ओव्हाळ, संजय गमे, कैलास भैरट, अरुण कांबळे, नारायण कुंभार यांच्या भक्तिरचनांनी सात्त्विक वातावरणनिर्मिती झाली होती. प्रमुख अतिथी ह. भ. प. अशोकमहाराज साठे यांनी आपल्या मनोगतातून, “सत्य सांगण्याचे धाडस संतांनी केले. त्यामुळे त्यांची शिकवण आचरणात आणल्यास मानवी जीवनात आनंदीआनंद निर्माण होतो!” असे मत व्यक्त केले. ह. भ. प. अशोकमहाराज गोरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “अठरापगड जातीच्या संतांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवली. जगद्गुरू तुकोबारायांचे आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी त्यांच्या अभंगांचा अभ्यास करावा!” असे आवाहन केले. नांदुरकीच्या रोपाचे जलपूजन, जगद्गुरू तुकोबाराय आणि
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या भक्तिशक्तिशिल्पाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तानाजी एकोंडे यांनी संवादिनीच्या सुरात सादर केलेल्या “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…” या भक्तिरचनेने कविसंमेलनाची सुरुवात झाली. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी उपस्थितांनी संत तुकोबाराय यांच्या वैकुंठगमन प्रसंगाची आठवण म्हणून तुकोबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली. यावेळी शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी तुकोबांच्या वैकुंठगमनाची भावपूर्ण कविता सादर करून उपस्थितांना सद्गदित केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या संयोजनात मीरा कंक, भाग्यश्री कंक, रवींद्र कंक, अविनाश कंक, उषा कंक, शरद काणेकर, मुरलीधर दळवी, विजया नागटिळक, दिलीप ओव्हाळ, सुंदर मिसळे यांनी सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. कवी शामराव सरकाळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *