पिंपरी (दिनांक : ०८ मार्च २०२३):- होळी आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून कृत्रिम रंग न वापरता फुले उधळून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने मंगळवार, दिनांक ०७ मार्च २०२३ रोजी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी साऱ्या…’ या विनोदी अन् विडंबन कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ एकपात्री हास्यकलाकार गजानन पातुरकर, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओक, बीना एज्युकेशन ट्रस्टचे संचालक अकमलखान यांची व्यासपीठावर; तसेच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. गजानन पातुरकर यांनी आपल्या मनोगतातून, “यंत्रयुगात माणूस हसणे विसरला असलातरी त्यासारखी निखळ आनंद देणारी गोष्ट नाही!” असे मत व्यक्त करून त्यांनी सुप्रसिद्ध सिनेकलावंत आणि गायक यांच्या नकला, शेरोशायरी, कविता सादरीकरणातून हशा अन् टाळ्या वसूल केल्यात. गणेश भुते यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या
“बायको माझी कधी भडकेल याचा नेम नाही!”
तसेच सुनंदा शिंगनाथ यांनी आगळ्यावेगळ्या शैलीतून म्हटलेल्या
“मामाच्या पोरीला लागलाय लळा…”
अशा एकापेक्षा एक सरस ढंगातील अन् वैविध्यपूर्ण आशयविषयातील विडंबन, विनोदी कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.‌ आय. के. शेख, प्राची देशपांडे, अशोक कोठारी, मृण्मयी नारद, नीलेश शेंबेकर, रेखा कुलकर्णी, राजेंद्र पगारे, सुहास घुमरे, मानसी चिटणीस, रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, मनीषा पाटील, रेणुका हजारे, विवेक कुलकर्णी, संजय खोत, शोभा जोशी, योगिता कोठेकर, जितेंद्र रॉय, रफीक अत्तार, दत्तू ठोकळे आदी सुमारे पंचवीस कवींनी उपहासिका, हजल, लावणी, राजकीय व्यंग अशा काव्यप्रकारांच्या माध्यमातून रसिकांना मनमुराद हसवले. इंद्रायणी थडी २०२३ या महोत्सवात ‘विश्वगुरू भारत’ हा विषय ऐनवेळी देण्यात आला होता. या विषयावरील गद्य आणि पद्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आलीत. त्यामध्ये पद्य विभागात मेघा देसाई आणि अभिजित काळे (प्रथम), रजनी अहेरराव आणि हेमंत जोशी (द्वितीय), वर्षा बालगोपाल आणि दीपक शिंदे (तृतीय); तसेच गद्य विभागात आनंद मुळूक आणि सीमा गांधी (प्रथम), सुरेश इन्नानी आणि नेहा कुलकर्णी (द्वितीय), भाऊसाहेब गायकवाड आणि उज्ज्वला केळकर (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. अश्विनी कुलकर्णी, प्रा. पी. बी. शिंदे, राजेंद्र घावटे आणि विनायक गुहे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात
रमेश वाकनीस, अरविंद वाडकर, माधुरी विधाटे, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण यांनी सहकार्य केले. प्रा. पी. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. संपत शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *