लातूर-(प्रशांत साळुंके)-आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने बहुमताने विजय मिळविण्याचा संकल्प केलेला आहे. या संकल्पपुर्तीसाठी पक्षाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात येत असून यामध्ये सर्वात महत्वाची असलेली महाविजय संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेली आहे.या समितीत भाजपाचे प्रदेश सचिव तथा लातूर भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.मराठवाड्यातून अरविंद पाटील निलंगेकरांची निवड झाल्याबद्दल त्यांचे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

लातूर भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे आपल्या संघटन कौशल्यासाठी परिचित आहेत. त्याचबरोबर निवडणूक मॅनेजमेंटसाठी त्यांची रणनिती वाखण्याजोगी राहत असते. विशेष म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मॅनेजमेंटमुळेच लातूर जिल्ह्यात भाजपाचे विविध मोठ मोठे कार्यक्रम व जाहीर सभा अत्यंत यशस्वीपणे पार पडलेले आहेत.अरविंद पाटील निलंगेकर यांचे संघटन कौशल्य आणि त्यांचा काम करण्याचा धडाका लक्षात घेऊन त्यांच्याकडे भाजपा प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती. या जबाबदारीच्या माध्यमातून अरविंद पाटील निलंगेकर यांनी भाजपाने बुथ बांधणीसाठी आयोजित केलेले समर्थ बुथ अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला होता.निवडणूका जिंकण्यासाठी बुथ बांधणी अत्यंत गरजेची असल्यामुळेच संपुर्ण महाराष्ट्रातील बुथ सक्षमीकरण करण्यासाठी समर्थ बुथ अभियानाच्या माध्यमातून अरविंद पाटील निलंगेकर यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. या माध्यमातून समर्थ बुथ अभियान यशस्वी होऊन भाजपाची बुथ बांधणी यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात येते. या अभियानात अरविंद पाटील निलंगेकर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोडून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतलेला होता.
लवकरच लोकसभा निवडणूका होऊ घातलेल्या असून यासोबतच प्रदेश भाजपाने विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केलेली आहे.या दोन्ही निवडणूकामध्ये भाजपाने स्वबळावर बहुमत मिळविण्याचा संकल्प केलेला असून या दृष्टीने वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात येत आहे.भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या समित्या कार्यरत राहणार आहेत. या समित्यांमध्ये सर्वाधिक महत्वाची असणारी महाविजय संयोजन समिती नुकतीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केलेली आहे.या समितीचे प्रदेश संयोजक म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांना नियुक्त करण्यात आलेले आहे.या समितीचे सदस्य म्हणून मराठवाड्यातून अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आलेली आहे.यासोबतच या समितीत प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक,प्रदेश सचिव श्वेता शालिनी,प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.या समितीचे विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अशिष शेलार हे राहणार आहेत.
भाजपा महाविजय अभियान संयोजन समितीत अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदर निवड केल्याबद्दल अरविंद पाटील निलंगेकर यांनी पक्ष श्रेष्ठींचे आभार व्यक्त करत त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवत आगामी निवडणूकामध्ये भाजपाला बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी आपण संपुर्णपणे योगदान देऊ अशी ग्वाही दिली असून तसेच आगामी प्रत्येक निवडणूकामध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने व एकजुटीने एकत्रीत कार्य करून हे अभियान यशस्वी करण्यासाठील योगदान द्यावे असे आवाहन केले आहे. या निवडीच्या माध्यमातून लातूरचा जो बहुमान पक्षश्रेष्ठीने केला आहे तो बहुमान प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा असून हा उंचाविण्यासाठी आपण सर्वजण परिश्रम घेऊ अशी ग्वाही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *