सत्ताधा-यांना धडा शिकविण्यासाठी राहुल कलाटे यांना निवडून द्या…
पिंपरी, 23 फेब्रुवारी – चिंचवडमधील प्रश्नांची राहुल कलाटे यांना संपूर्ण जाण आहे. त्यांचा अभ्यास आहे. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, पाण्याचा प्रश्न कठीण झाला आहे. हे प्रश्न सोडविण्याची क्षमता उच्चशिक्षित असलेले कलाटे यांच्यात आहे. कुठलाही प्रश्न सुटू शकत नाही असे नसते. फक्त प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती लागते. चिंचवडमधील प्रलंबित प्रश्न विधानसभेत जोरदारपणे मांडून मार्गी लावण्यासाठी कलाटे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मागीलवेळी कलाटे यांच्या थोड्या मतांनी पराभव झाला. त्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढा आणि कलाटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे असे आवाहन वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ अॅड. आंबेडकर यांची रावेतयेथे मोठी प्रचार सभा झाली. शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार राहुल कलाटे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, अमित गावडे, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे, मीनल यादव, वंचितचे अनिल जाधव, अशोक सोनेने, अमित भुईगळ, प्रा. किसन चव्हाण आदी उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भाजप संपवत आहे. त्यासाठी कसबा आणि चिंचवडची जागा शिवसेनेला दिली पाहिजे होती. राष्ट्रवादीला उमेदवार द्यायचा होता तर त्यांनी ताकदीचा उमेदवार द्यायला हवा होता. या उमेदवारामुळे भाजपला फायदा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी द्यावी, आम्ही प्रचाराला येतो असे सूचविले होते. मात्र, त्यांना उमेदवारी दिली नाही. याचे गमक आता आम्हाला कळत आहे. राष्ट्रवादीला 2014 च्या निवडणुकीत 40 हजाराच्यावर मते मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा उमेदवार ताकदीचा नाही हे दिसून येते. त्यामुळेच आम्ही कलाटे यांना पाठिंबा दिला.
रेड झोनमधील घरे नियमित करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरकारची योजना मान्य करून ती राज्य सरकारकडे पाठवावे लागते. राज्य सरकारने तो ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. उद्याची पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे. ती तशीच ठेवायची असेल तर कलाटे यांच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, हे लक्षात ठेवा. पोटनिवडणूक ही सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी असते. पोटनिवडणूक 2024 च्या निवडणुकीची सुरुवात आहे. त्यामुळे चिंचवडच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना निवडून देवून सत्ताधा-यांना धडा शिकवावा”.
”बेरोजगारी कमी करायची असेल. तर, सरकारचा पैसा सार्वजनिक क्षेत्रामार्फत तरुणांकडे आला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही हाताला काम मिळेल” असे सांगत अॅड. आंबेडकर म्हणाले, ”रशियाकडून आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा 25 डॉलरने कमी आपण क्रूड ऑइल खरेदी करीत आहोत. मात्र आपल्याकडे रोज पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. मग हा निधी जातोय कोठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याचे उत्तर केंद्र सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री होऊ इच्छिणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. उज्वल योजनेतील घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त भावात मिळत नाही. ते बाजारभावाप्रमाणे घ्यावे लागते. परवडत नाही म्हणून सिलिंडर वापरायचे या लाभार्थी गृहिणीनी बंद केले आहे. हा निधी जातोय कुठे? याचे उत्तर भाजपने द्यावे. हे सरकार फसवे असून मोठी लढाई आपल्याला लढायची आहे”.
”सरकारी मालमत्ता विकल्यावर पैसा कोठे जातो ? ते माहिती नाही. सरकार आपल्याला कंगाल व्यवस्थेकडे घेऊन चालले आहे. यांना धडा शिकविला नाही तर हे काहीही विकतील अशी परिस्थिती आहे. सर्वत्र खासगीकरण चालू आहे. केंद्रातील, राज्यातील सरकारला धडा शिकविण्यासाठी पोटनिवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना निवडून देवून सत्ताधा-यांना धडा शिकवा” असे आवाहनही त्यांनी केले.