भाजपकडून स्मार्ट सिटीच्या गप्पाच केल्या जात असल्याचा आरोप…
पिंपरी दि.१८:- आमदार लक्ष्मण जगताप आजाराशी झुंज देत होते तेव्हाच त्यांना सरणावर चढवायची घाई झालेल्या भाजपने चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती. निष्ठुर भाजपने सहानुभूती या शब्दाचा गळा घोटला आहे. त्यामुळे त्यांना लोकांची सहानुभूती मुळीच मिळणार नाही असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केले. चिंचवडचा विकास केला म्हणणाऱ्यांनी आधीच विकास झालेल्या भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केल्याचा केवळ भास निर्माण केला हे न ओळखण्याइतकी जनता दूधखुळी नाही अशी टीकाही त्यांनी केली
महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिट्टी या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.
राहुल कलाटे म्हणाले की ,चिंचवड मधील जनता माझ्याबरोबर आहे या आधीच्या निवडणुकांचा निकाल पाहिला तर जनता मला नक्कीच संधी देईल. ‘ना नेता ना पक्ष’ ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. चिंचवडची जनता मलाच कौल देईल असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.
तिहेरी लढतीचा फायदा भाजपला होईल असे बोलले जाते त्याबद्दल विचारले असता तिहेरी लढतीचा फायदा सक्षम उमेदवार म्हणून मलाच होईल असे कलाटे म्हणाले. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सहानुभूती असल्याकडे लक्ष वेधले असता कलाटे म्हणाले की, मलाही सहानुभूती आहे सन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मी लक्षणीय मते घेतली आहेत. त्यामुळे आता मला सहानुभूती मिळेल. मागील निवडणुकीत मतदारांनी खुद्द लक्ष्मण जगताप समोर असताना मला एक लाख बारा हजार मते दिली होती याची आठवण कलाटे यांनी करून दिली.
चिंचवड मतदार संघ हा कॉस्मोपॉलिटीन एरिया आहे या मतदारसंघात सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने राहत आहेत. चिंचवड मतदार संघाचे प्रश्न सोडवायचे असतील व सिंगापूरच्या धर्तीवर मतदार संघाचा विकास करायचा असेल तर उच्चशिक्षित उमेदवाराची निवड जनतेने करणे गरजेचे आहे.
चिंचवडचा विकास केला असा दावा करणाऱ्या मंडळींनी स्मार्ट सिटी अंतर्गत काय विकास केला हे चिंचवड मतदार संघातीलच नव्हे तर अख्ख्या पिंपरी चिंचवड मधील जनतेला माहित आहे. आधीच विकसित झालेल्या भागावर उधळपट्टी करण्याऐवजी रहाटणी,काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी सारख्या भागाचा विकास केला असता तर मतदार संघाचा समतोल विकास झाला असता. असे कलाटे म्हणाले. वाकड मध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण अनेक विकास कामे मंजूर करून आणली व मार्गी लावली. या उलट भाजपने बंद जलवाहिनी प्रकल्प, रेड झोन सारखे प्रश्न लोंबकळत ठेवले आहेत. हे जनतेला पक्के माहित आहे त्यामुळे यावेळी चिंचवड मतदार संघात इतिहास घडेल व सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.