पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) ने दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द केली. महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांना १७ फेब्रुवारीपासून दोन आठवड्यांत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश मॅटने राज्य सरकारला दिले आहेत.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली होती. मात्र, राजकीय दबावामुळे राज्य शासनाने आदेशावर घुमजाव करत त्यांची पदोन्नती रद्द केली. याबाबत स्मिता झगडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबई (मॅट) मध्ये दाद मागितली होती. त्यावर पाच महिन्यांनी मॅटने निकाल दिला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची १३ सप्टेंबरला बदली झाली. त्यांच्या जागेवर स्मिता झगडे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २२ सप्टेंबरला आदेशावर घुमजाव करत स्मिता झगडे यांची पदोन्नती रद्द केली. तर प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. याबाबत, स्मिता झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती.
महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) चे सदस्य ए. पी. कुल्हेकर यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावणी झाली. प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करत उपायुक्त स्मिता झगडे याना १७ फेब्रुवारीपासून दोन आठवड्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश ए. पी. कुल्हेकर यांनी राज्य शासनाला दिले आहेत.