कलाटे यांनी मानले प्रकाश आंबेडकर यांचे आभार  

पिंपरी:- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे. चिंचवडमध्ये भाजपला राहुल कलाटे रोखू शकतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीनेही वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. पण, वंचितने कलाटे यांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप बरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी  1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी मध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडीने पूर्ण विचार करून भाजपला पिपरी-चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले. तर, राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.

पाठिंबा मिळाल्यानंतर राहुल कलाटे म्हणाले, पाठिंबा दिल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो. मागील निवडणुकीतही त्यांनी मला पाठिंबा दिला होता. वंचितने पाठिंबा दिल्याने माझे मनोबल उंचावले आहे. वंचितचा पाठिंबा, चिंचवडच्या जनतेचे आशिर्वाद या जोरावर मी नक्कीच विजयी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *