पिंपरी :- शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात आज मंगळवारी (दि.७) रोजी भरला. यावेळी माजी नगरसेवक अमित गावडे, नवनाथ जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना राहुल कलाटे म्हणाले, २००९ पासून चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस चालत नाही. त्यामुळेच लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मी सुद्धा मागील वेळेस अपक्ष निवडणूक लढविली होती. अजितदादांना आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहर कळले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणीही लढायला तयार नव्हते. लोकसभेची लाट आल्यानंतर हे सगळे उमेदवार, जे आता तथाकथित पुढे आले ते सगळे घरी गेले होते. ज्यावेळेस मी निवडणूक लढायची ठरवली, तेव्हा बाकीच्या पक्षांनी आणि संघटनांनी मला त्यावेळी साथ दिली होती.

एकंदरीत चिंचवडच्या जनतेचा मूड वेगळा आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी मला प्रेम दिलं. १ लाख बारा हजार मतं मला त्यांनी दिली होती. त्यांनी माझ्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं. मतदारसंघाची जडणघडणही वेगळ्या पद्धतीची आहे. हा कॉस्मोपोलिटिन मतदार संघ आहे. जनतेच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे मी सर्वांगीण विकास करू शकतो. शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करताना लोकांना न्याय देण्याचे काम केले. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. मी निवडणूक लढविणार आहे, असे कलाटे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *