पुणे:– कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुक्ता टिळक व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. गेले अनेक दिवस येथून भाजप व महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याबाबत सस्पेन्स होता. दोन्ही ठिकाणी इच्छुकांनी आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली होती. आपल्याला तिकीट मिळेल या शक्यतेने इच्छुकांनी उमेदवारी अर्जही घेऊन ठेवले आहेत.
आज भाजप व महाविकास आघाडीकडून उमेदवार निवडीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून कसबा हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला तर चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असे सूत्र ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रसचे रविंद्र घंगेकर तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहूल कलाटे यांना तिकीट मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
भाजपकडून मात्र अद्यापी कोणाला तिकीट मिळणार याचे संकेत मिळत नाहीयेत. बहुधा महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याच्यावर त्यांचे उमेदवार ठरणार असावेत असे दिसत आहे.
