पिंपरी (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२२) जागतिक वारसा सप्ताह आणि देवदीपावलीचे औचित्य साधून इतिहासप्रेमी तरुण मंडळ, चिंचवड यांनी गुरुवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी हेरिटेज वॉक (वारसा फेरी)चे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा या ऐतिहासिक वारसास्थळांची माहिती दिली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देवमहाराज, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह प्रा. माधव राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, शिरीष पडवळ, सुभाष चव्हाण, इतिहासप्रेमी तरुण मंडळाचे अध्यक्ष पद्मेश कुलकर्णी यांच्यासह आठ ते ऐंशी वयोगटातील इतिहासप्रेमी नागरिकांनी या उपक्रमांत सहभागी होऊन इतिहास जाणून घेतला.

वारसास्थळांची माहिती देताना श्रीकांत चौगुले म्हणाले की, “जागतिक, राज्यस्तरीय आणि स्थानिक या तीन स्तरांवर किमान शंभर वर्षांपासून जास्त काळ अस्तित्वात असलेल्या प्राचीन स्थळांचा ऐतिहासिक वारसा म्हणून समावेश केला जातो. महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या पुढील पिढीतील आठ सत्पुरुषांच्या समाधिस्थळांचा समूह आध्यात्मिक अन् ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. देशासाठी एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी पत्करलेल्या हौतात्म्य्याचे एकमेव उदाहरण असलेल्या चापेकर बंधूंच्या वाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले असले तरी मूळ जागा, चापेकर कुटुंबाचे देव आणि त्यांची शस्त्रास्त्रे लपवून ठेवण्याची विहीर अजूनही मूळ स्थितीत आहे; तर पेशवेकालीन वास्तुशैलीतील पिंपरी-चिंचवडमधील एकमेव वास्तू म्हणजे मंगलमूर्ती वाडा होय. या तिन्ही स्थळांमुळे भारतीय इतिहासात चिंचवडचे स्थान अबाधित आहे!” मंगलमूर्ती वाड्यात दीपोत्सव साजरा करून वारसाफेरीचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *