पिंपरी (दिनांक : ११ सप्टेंबर २०२२) “संत समाजपरिवर्तनाचे कार्य करतात!” असे विचार सांगवी येथील सद्गुरू साधुबाबा ब्रह्मसंप्रदाय प्रणीत- स्वस्वरूप शोधक साधक संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राघवचैतन्यमहाराज यांनी शनिवार, दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी काळेवाडी, पिंपरी येथे व्यक्त केले.

श्री सद्गुरू सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ब्रह्मलीन विठ्ठलानंद मतेदादा महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात निरूपण करताना राघवचैतन्यमहाराज बोलत होते. नांदेड (पुणे) येथील ओम निरंजन साधकाश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. दत्ताभाऊ कोरपडेमहाराज, ह.भ.प. गुलाबराव नरकेमहाराज, ब्रह्मसंप्रदाय संस्था कामरगाव (जिल्हा अहमदनगर) येथील ह.भ.प. बाळासाहेब भुजबळमहाराज, ह.भ.प. नामदेव जाधवमहाराज, ह.भ.प. पोपट पाडेकरगुरुजी, ह.भ.प. नामदेव चौधरी तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, नंदकुमार मुरडे, रघुनाथ पाटील, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, नारायण कुंभार, दिलीप कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी निरंजन साधकाश्रम परिवार, ब्रह्मसंप्रदाय परिवार यांच्या साधकांनी आपल्या मनोगतांमधून ह.भ.प. विठ्ठलानंद मतेदादामहाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यक्तिगत आठवणींना उजाळा देत भक्तिरसाचा परिपोष करीत उपस्थितांना सद्गदित केले. ह.भ.प. राघवचैतन्यमहाराज यांनी संत एकनाथमहाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना आपल्या ओघवत्या शैलीतून, “प्रपंचातील व्यवस्था अन् परमार्थामधील अवस्था सांभाळण्यासाठी मानवी जीवनात संतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधूची शक्ती आणि संतांची भक्ती यांचा समन्वय संतांनी घातला. भक्ती आणि शक्तीचा संगम झाला की भक्ती वृद्धिंगत होते. संतांच्या चरणस्पर्शाने नदीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर होते तद्वतच संतसान्निध्यात सामान्य माणसाच्या अंत:करणातील सात्त्विक लहरी जागृत होतात; कारण विचार, उच्चार अन् आचार ही सद्मार्गाची त्रिसूत्री संत प्रदान करीत असतात!” असे विचार मांडले.

कार्यक्रमाच्या संयोजनात ह.भ.प. अशोक गोरेमहाराज, कैलास अवचट, हरिभाऊ कुटे, रावसाहेब कातोरे, वाघबाई, रुक्मिणी धामणे, सुनंदा वाजे, विवेक मते, जगन्नाथ मते, शरद काणेकर, किसन मते, संजय भगत, शंकर मते, अलका श्रीमंदीलकर यांनी परिश्रम घेतले.

प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *