पिंपरीत आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती…

पिंपरी, पुणे (दि. ३सप्टेंबर २०२२) : मागील दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साजरे करण्यास निर्बंध होते. आता पुन्हा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सर्वत्र गणेश उत्सव साजरा होत आहे. या आनंदाच्या काळातही वसुंधरेच्या रक्षणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पिंपरीत केशव नगर येथे आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने “श्रीं” च्या मूर्ती विसर्जनासाठी भव्य कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संयोजक विजय आसवानी आणि उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी यांनी केले आहे.

आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण तीन हौद उभारण्यात आले आहेत. याचे औपचारिक उद्घाटन पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते रविवारी (दि.४) सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन विजय आसवानी यांनी केले आहे. मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक याठिकाणी सहकार्य करत आहेत. पिंपरी चिंचवड, काळेवाडी,पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, तानाजीनगर, लिंकरोड परिसरातील नागरिकांच्या घरगुती गणपतींचे तसेच सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे करता येईल. भाविकांसाठी विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि निर्माल्यकुंडची व्यवस्था केली आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मृर्ती विसर्जन करतील. येथे विसर्जित केलेल्या मूर्तींचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मार्गदर्शना खाली विघटन केले जाईल. त्यातून जमा झालेल्या मातीतून आकर्षक कुंड्या बनवून त्या कुंड्यांचे भाविकांना व गणेश मंडळांना संयोजकांच्या वतीने मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशीही माहिती उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी दिली आहे.
—————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *