वेग, गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा संगम; १०० दिवसांत उभी केली भव्य इमारत!
पिंपरी-चिंचवड : दि. १८ मार्च २०२६ :- पुणे महानगर परिसरात बांधकाम क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी समोर आली असून, केवळ १०० दिवसांत १४ मजली उंच निवासी इमारत उभी करत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा. लि. यांनी इतिहास घडवला आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर-१२, चिखली येथे तब्बल ६,४५२ घरांच्या प्रकल्पातील एका इमारतीचे काम अवघ्या १०० दिवसांत पूर्ण करण्यात आले. सुमारे ८०,४५३ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक ३एस प्री-फॅब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान भारत सरकारच्या केंद्रीय लोकनिर्माण विभागाकडून (BMTPC) मान्यताप्राप्त असल्याने या प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता अधिक ठळकपणे अधोरेखित होते.या १४ मजली इमारतीतील प्रत्येक घर सुमारे ५२७.४३ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे असून, दोन बेडरूमसह सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. रहिवाशांसाठी दोन लिफ्ट्स, अग्निशामक यंत्रणा, सौरऊर्जा प्रणाली, पाणीपुरवठा अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, एवढ्या वेगाने आणि गुणवत्तेची तडजोड न करता पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण झाला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी अशोक अदक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या कामगिरीची खातरजमा केली आणि १८ मार्च २०२६ रोजी कंपनीचे प्रतिनिधी श्री योगेश काजळे, श्री नितीन कदम आणि श्री जितेंद्र राक्षे यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. पुण्यातील ही विक्रमी कामगिरी आता देशभरात चर्चेचा विषय ठरत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात क्रांती घडू शकते, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
