पिंपरी प्रतिनिधी :– पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर दरम्यान नदीवरील समांतर पुलाचे काम पुर्णत्वाकडे आले असून लवकरच पुलाचे लोकार्पण सोहळा घेण्यात येईल अशी माहिती मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली. सदर पुलाच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, मा. नगरसेवक संदीप वाघेरे, बी.आर.टी.एस. स्थापत्य विभागाचे व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्या समवेत करण्यात आली.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील वाहतूक समस्यावर तोडगा काढण्यासाठी दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी माझ्या वतीने पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर या दरम्यान पवना नदीवर समांतर पूल उभारण्यात यावा या विषयाचे मा. आयुक्तांना पहिले पत्र देण्यात आले होते यानुसार महापालिकेच्या वतीने स्तूप कन्सल्टट प्रा. लि. या सल्लागाराचे नेमणूक करत महापालिकेच्या वतीने १२,५६,५७,५१८ /- इतक्या रकमेची १८ महिने कालावधीसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार व्ही. एम. मातेरे या संस्थेस पुलाच्या उभारणीचे काम देण्यात आले. एकूण १०० मीटर लांबीच्या पुलाची रुंदी १२ मीटर असून पुलाच्या एका बाजूस पादचाऱ्यासाठी ३ मीटर रुंदीचा पदपथ करण्यात आलेला असून पुलावर नागरिकांना विसावा घेण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार असून पुलावरील वाहन मार्गिका ८.१ मीटर रूंदीची असणार आहे. या पुलाचे एकदिशा वाहतुकीचे नियोजन असणार आहे. सदर पुलाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत घुले, राकेश मोरे, सुहास कुदळे, विश्वास घुले यांच्या समवेत बी.आर.टी.एस. स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अभिमान भोसले, कनिष्ठ अभियंता प्रणिता पिंजण तसेच विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संजय खाबडे, कार्यकारी अभियंता बाळू लांडे, कनिष्ठ अभियंता विशाल ठुबे उपस्थित होते.
समांतर पुलाचे काम पूर्णत्वास आलेले वाहतूक सुरु झाल्यानंतर पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, रहाटणी, पिंपळेसौदागर, काळेवाडी, पिंपळे गुरव, कासारवाडी येथील वाहतूक समस्या संपणार असून नागरिकांच्या सेवेकरिता सदर पुलाचा लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे अशी माहिती वाघेरे यांनी दिली आहे.