पिंपरी :- ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या क्रांतिकारकांविषयीच्या पुस्तकाला हिंगोली येथील समृद्धी प्रकाशन संस्थेचा २०२३ साठीचा ‘संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार ‘ जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे संयोजक प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी तसे कळविले आहे.
अरुण बोऱ्हाडे लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या पुस्तकामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात बलिदान दिलेल्या सुमारे एकावन्न स्त्री – पुरुष सशस्त्र क्रांतिकारकांची अभ्यासपूर्ण चरित्रे आणि माहिती लिहिली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असलेल्या या पुस्तकात देशाच्या विविध प्रांतातील अनेक ज्ञात- अज्ञात क्रांतिकारकांचा नव्या पिढीला परिचय होणार आहे. या पुस्तकाचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होणार असून त्यामध्ये सुमारे पन्नास क्रांतिकारकांची चरित्र माहिती समाविष्ट असेल, असे लेखक अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले.
पहिल्या इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले अरुण बोऱ्हाडे यांची विविध विषयांवरील बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांच्या ‘वेध सामाजिक जाणिवांचा’ या पुस्तकासाठी मुंबईच्या मराठा मंदिर साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
या संत नामदेव पुरस्काराचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. नवीन सोळंके आणि प्रा.डॉ. बाबुराव खंदारे यांनी काम पाहिले.