– भाजपा आमदार महेश लांडगे यांची ‘ऑनफिल्ड’ पाहणी
– आगामी सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराची पुणे आणि सभोवतालच्या औद्योगिक पट्टयातील ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने प्रमुख ‘धमनी’ म्हणून विकसित होणारा मोशी-चऱ्होली ९० मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या ९ हजार ५६३ मीटर रस्त्यापैकी ७ हजार ८०३ मीटर रस्ता विकसित केला आहे. उर्वरित सुमारे दोन किमी रस्त्याच्या काम आगामी ६ महिन्यात पूर्ण करावे, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

मोशी ते चऱ्होली ९० मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोशीतील जयगणेश साम्राज्य चौकातून सुरू होणारा हा रस्ता प्राईड सिटी, चऱ्होली येथे संपतो. पहिल्या टप्प्यात ९ हजार ५६३ मीटरपैकी ७ हजार ८०३ मीटर रस्ता विकसित झाला आहे. उर्वरित सुमारे २ किमी रस्त्याचे भूसंपादन, शेतकऱ्यांचे प्रश्न, अ-ब पत्र, टीडीआर या तांत्रिक अडचणींबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांनी ‘ऑनफिल्ड’ पाहणी आणि चर्चा केली.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगररचना विभागाचे सहसंचालक संदेश खडतरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
आयुक्त स्वत: घेणार आढावा…
‘‘मोशी-चऱ्होली-चिखली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ झपाट्याने विकसित होत आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. चऱ्होली, प्राईड सिटी आणि परिसराची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवणे आणि पिंपरी-चिंचवडमधून पुणे- सोलापूर महामार्ग, पुणे-नगर महामार्गाला जाण्यासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुणे महापालिका हद्दीतून वाघोली ते चऱ्होलीपर्यंत या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता आगामी काळात चऱ्होलीसह पिंपरी-चिंचवडची वाहतूक सक्षम करणारी प्रमुख ‘धमनी’ ठरणार आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे या कामासाठी किमान १५ दिवसांतून एकदा आणि आयुक्त शेखर सिंह महिन्यातून एकदा आढावा बैठक घेणार आहेत.
*****

पिंपरी-चिंचवड शहरातून नगर महामार्ग, सोलापूर महामार्गाकडे जाण्यासाठी मोशी-चऱ्होली ९० मीटर रस्ता ‘सुपरफास्ट’ ठरणार आहे. यासह ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ झपाट्याने विकसित होत असून, या भागातील नागरिकांना पुणे, पिंपरी-चिंचवड, लोहगाव विमानतळ आणि औद्योगिक पट्टयातील ‘कनेक्टिव्हीटी’ सक्षम होण्यास मदत होईल. पुणे महापालिका हद्दीतील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील रस्ता आगामी ६ महिन्यांत विकसित व्हावा, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *