पिंपरी :- पिंपळे गुरव येथे 52 व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहा निमित्त दिलासा संस्था, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने जनजागृती पर सुरक्षितता पथनाट्य पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे घेण्यात आले.
कामगारांचे प्रबोधन आपण करायचे हाय..
सुरक्षित काम करून जीव जपायचा हाय..
सुरक्षित करुया काम,अपघाताला देऊ पुर्ण विराम.
नजर हटी,दुर्घटना घटी.
असा ठेका धरीत गोल रिंगण करून उद्यानात सकाळी सकाळी मोकळा प्राणवायू घ्यायला आलेल्या नागरीकांचे लक्ष वेधून मानवी सुरक्षिततेचे महत्व पथनाट्याच्या माध्यमातून सर्वांना पटवून देण्यात आले.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार विजेते सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार सौ. संगीता जोगदंड, सुरक्षारक्षक आत्माराम हारे, बजाज ऑटोचे कामगार मुरलीधर दळवी यांनी या पथनाट्यात सहभाग घेतला होता.
माझी सुरक्षितता मीच जबाबदार! असे आवाहन या पथनाट्यातून करण्यात आले. माणसांनी सुरक्षितता कशी पाळावी? याबाबतचे पथनाट्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांना समजेल, उमजेल अशा हलक्या फुलक्या भाषेत उस्फूर्तपणे प्रबोधन करण्यात आले. “अपघात अग्नी तर सुरक्षितता पाणी आहे.” “गोष्ट साधी, सुरक्षितता आधी.’ हेलमेट , बुट, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी गॉगल वापरा. होऊ द्या दोन मिनिटं उशीर, पण आयुष्य मिळेल खात्रीशीर. जो चुकला नियमाला,तो मुकला जीवनाला,काम करताना मारु नका गप्पा, नाहीतर जीवनाचा असेल शेवटचा टप्पा.अशी घोषवाक्ये असलेले फलक हाती घेऊन प्रबोधन करण्यात आले. आण्णा जोगदंड यांनी अंगावरील कपड्यांवर ” सर सलामत तो पगडी पचास “असे अनेक सुरक्षितता संदर्भात घोषवाक्ये व माहिती लिहून उपस्थितीत माणसांचे लक्ष वेधले. यावेळी आण्णा जोगदंड यांनी सर्व उपस्थित नागरिकांना सुरक्षिततेची शपथ दिली.
याप्रसंगी सुरेश कंक, आण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, संगिता जोगदंड, आत्माराम हारे,प्रकाश घोरपडे,सुभाष चव्हाण पथनाट्याच्या प्रमुख भूमिकेत होते. वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, हास्यक्लब प्रमुख प्रताप साबळे, मारुती हुघगे,निलेश हंचाटे,अमोल लोंढे, प्रकाश बंडेवार,जालिंदर दाते,बाळासाहेब साळुंके, महेंद्र गायकवाड, अरविंद मांगले,फुलवती जगताप, कवयित्री राधाबाई वाघमारे, अशोक गोरे महाराज, सोमनाथ कोरे,हिरामण देवरे,नंदकुमार कांबळे, इंद्रजित चव्हाण, संजय गमे, जयश्री गुमास्ते,श्रावणी अडगळे,सचिन शिंदे, उमा मोटेगांवकर,उपस्थित होते.
सकाळच्या व्यायामाबरोबर हे पथनाट्य पाहून रसिक आनंदी झाले. जीवन सुरक्षा महत्त्वाची हे पटवून सांगण्यात हे सुरक्षा विषयक पथनाट्य यशस्वी झाले.
