पिंपरी, दि.२३ – तुमचे लक्ष्मणभाऊ, माझे साहेब गेले, पण आपला गड आपणाला राखायचा आहे, अशी भावनिक साद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि.२३) घातली. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना भरून आले होते.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतीली पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, रासपचे शहराध्यक्ष भारत महानवर, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर व जगताप कुटुंबावर आली. तुम्ही मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे मला हिंमत आली. माझे पती दिवंगत लक्ष्मण जगताप वाघासारखे जगले. ते आजारी असताना त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू होते. त्यांना अमेरिकेतून आणलेली औषधे दिली जात होती. ते अशक्त झाले होते. डॉक्टरांनी त्यांना व्हिलचेअरवर फिरवण्याचे आणि त्यांना माणसांसोबत बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी त्यांना भेटायला आलेल्या लोकांना भेटण्यास सांगितले. अनेकजण तुम्हाला भेटण्यास, तुम्हाला एक नजर पाहण्यासाठी आतुर असल्याचे सांगितले. त्यांनी ऐकले आणि रुग्णालयाच्या खिडकीतून भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना पाहिले. तुम्हा सर्वांना पाहिल्यानंतर त्यांच्यात ताकद आली. ते व्हिलचेअरून उठून चालत आले. तुम्हाला पाहून ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले होते. जनता ही त्यांना हिंमत देणारी बाब होती. जनता ही त्यांची ताकद होती.

कोरोना काळात त्यांनी जनतेची तळमळ वाटत होती. त्यांनी महिलांना विनंती करून किचन सुरू केले. रोज २५ ते ३० हजार लोकांचे जेवण बनवून डबा पोहोचवत होते. शहराच्या स्मार्ट सिटीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण आज त्यांचे शिल्प झाले. त्यांचे स्वप्न होते पिंपरी-चिंचवड जगाच्या नकाशावर दिसावे. जगामध्ये वेगळे ते आमच्या पिंपरी-चिंचवडमध्ये हवे, असे त्यांना वाटायचे. नाते जिव्हाळ्याचे, कार्य समृद्धचे हे नाते त्यांनी जपले. अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्न त्यांनी पाठपुरावा करून सोडवला. फक्त जीआर काढायचे बाकी आहे. साहेब गेले पण आपला गड आपणाला राखायचा आहे. आपण सर्वजण पाठीशी उभे राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी भाजपला मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *